Product Details
ती बहुजन आहे, बहुसंख्य आहे पण तरीही तिची कुठेही स्वतंत्र ओळख नाही. समाजाच्या चलनवलनात तिचं स्वतंत्र स्थान नाही. मधल्या आणि मागास जातींची असलेली ती रोजच्या जगण्यात सर्वसामान्य म्हणून ओळखली जाते. अर्धपोटी, अर्धशिक्षित असलेल्या तिचे श्रम आजही या समाजव्यवस्थेत पायाभरणीचं काम करत आहेत. आणि तरीही ती परिघावरचं उपेक्षित जिणं जगत आहे. शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत, आरोग्यापासून ते माणूस म्हणून असलेल्या मूलभूत हक्कांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती शोषित आहे. तिची भाकरी - अर्थात तिचं संपूर्ण जगणंच तिच्या डोळ्यासमोर चोरलं जात आहे, हिरावलं जात आहे. त्याला विरोध करण्याचं बळ तिच्यापाशी आजही नाही. उच्चजातीय, उच्चवर्गीय स्त्रीपेक्षा बहुजन स्त्रीच्या जगण्याचे ताणेबाणे सर्वस्वी वेगळे आहेत. जातीव्यवस्था, पुरुषसत्ता आणि वर्गव्यवस्था यांच्या तिहेरी शोषणासमोर बहुजन स्त्री एकाकी उभी आहे. म्हणूनच ‘सर्व स्त्रिया एक असतात, सारख्याच शोषित असतात’ यासारखी खिचडी पद्धतीची विधानं नाकारून बहुजन स्त्रियांचं वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करण्याची गरज आहे. प्रस्तुत पुस्तक हे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करतं. या वेगळेपणाची एक सुस्पष्ट मांडणी करण्याचा प्रयत्न करतं. बहुजन स्त्रीचं वेगळेपण, तिचं शोषितपण, वंचितपण पृष्ठभागावर येण्यासाठी तिच्या वर्तमान स्थिती-गतीचा, कष्टाच्या वाटेवर चालतानाही ती कोणती धुळाक्षरं गिरवत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. बहुजन स्त्रीचा इतिहास जितका तिच्या वर्तमानाशी जोडला आहे. तितकंच तिचं भविष्य तिच्या वर्तमानात अडकलेलं आहे. म्हणूनच तिच्या वर्तमानाचं योग्य आकलन असण्याची गरज आहे. ‘तिची भाकरी कोणी चोरली? - बहुजन स्त्रीचं वर्तमान’ या अभ्यासप्रकल्पाचा हाच उद्देश आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
320 |
Shades / Types